पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
९२
 

पण ती दुय्यम होय. मुख्य राजधानी बदामी हीच होती. ही नगरी आजच्या विजापूर जिल्ह्यात म्हणजे कर्नाटकात जाहे. चालुक्य हे कानडी होते असे म्हणणारा पक्ष हे एक प्रमाण म्हणून देतो. आणि वर जी विचारसरणी मांडली आहे तिच्या अभावी त्या प्रमाणाला महत्त्व आलेही असते. पण आज गोवा, बेळगाव, कारवार यांबद्दल जे वाद चालू आहेत त्यांवरून प्रदेशांच्या सीमारेषा आजही किती अनिश्रित असतात ते ध्यानी येईल. पंजाब व बंगाल यांची फाळणी होऊन इकडचे अनेक जिल्हे तिकडे झाले व पूर्व पंजाबची पुन्हा फाळणी होऊन हरयाना प्रदेश निराळा झाला आणि आज राजधानी चंदीगड हिच्याविषयी वाद निर्माण झाला आहे. या घटना पाहता बदामीचा आजचा भूगोल त्या काळी ती कर्नाटकातच होती हे निश्चित ठरविण्यास पुरा पडेल असे नाही.
 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा विचार करताना प्रथम येथील राजशासनांचा विचार करणे अवश्य होते. कारण स्वकीय राजसत्तेवाचून संस्कृतीचा उत्कर्ष होत नाही. म्हणून गेल्या प्रकरणात सातवाहनांचा व या प्रकरणात वाकाटक ते यादव या पाच राजघराण्यांचा विचार आपण केला. इतिहाससंशोधनाच्या प्रारंभी या काळात इतिहाससाधने फारशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सहा राजघराण्यांच्या विषयी अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले होते. आणि ही सर्व घराणी कोणाच्या ना कोणाच्या मते महाराष्ट्राला परकी ठरली होती. पण गेल्या तीसचाळीस वर्षांत नाणी, शिलालेख, ताम्रपट या साधनांची विपुल उपलब्धी झाली व संशोधनाला नवी दिशा लागली. ते सर्व संशोधन व इतिहासपंडितांनी त्यासंबंधी केलेली चर्चा ही ध्यानात घेऊन या घराण्यांकडे मी पाहू लागलो तेव्हा ती सर्व सहाही घराणी महाराष्ट्रीय आहेत असा माझ्या मनाशी निर्णय झाला. त्या निर्णयामागे कोणती विचारसरणी आहे त्याचेच विवेचन या प्रकरणात केले आहे. एखादे घगणे मूळ कोठून आले हा खरा निकष नसून ते स्वराज्य कोणत्या भूमीला मानते, त्याने कर्मभूमी कोणती निवडली, स्वजन कोणाला म्हटले, पराक्रम कोणासांगाती केला हा माझ्या मते खरा निकष होय. विचारवंतांना, इतिहासवेत्त्यांना हा निकष मान्य होईल असे मला वाटते. तसे झाल्यास ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती हा त्याअन्वये निघणारा निष्कर्षही त्यांना ग्राह्य वाटेल अशी आशा व्यक्त करून ही लांबलेली चर्चा संपवितो.