पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
९०
 



उत्तर चालुक्य
 बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट यांचा याच दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यांची भाषा कानडी होती; पण कर्नाटक हा त्यांनी कधीही आपला मानला नाही. गंगवाडी, वनवासी, नोळंबवाडी, वाणवाडी या कर्नाटकातील राज्यांशी त्यांचे पिढ्यान् पिढ्या वैरच होते. तेव्हा गुजराथ, मावळा, कोसल, कांची या प्रदेशांप्रमाणेच ते कर्नाटकही परप्रांत मानीत होते, तो त्यांच्या स्वराज्यात नव्हता, है उघड आहे. राष्ट्रकूटांच्या मागून सत्ताधीश झालेले कल्याणीचे चालुक्य यांचीही हीच दृष्टी होती. तैलप २ रा हा या चालुक्यांच्या सत्तेचा संस्थापक. सत्ताधीश होताच त्याची पहिली लढाई झाली ती गंग, वनवासी, नोळंबवाडी यांचा राजा पांचालदेव याशी. कारण राष्ट्रकूटवंशीय राजा इन्द्र याला त्याने आश्रय दिला होता. या लढाईत पांचालदेव प्राणास मुकला. तेथून पुढे सत्याश्रय, सोमेश्वर पहिला, सोमेश्वर दुसरा, विक्रमादित्य यांच्या कारकीर्दीत गंग, वनवासी यांशी एकेकदा तरी चालुक्यांची लढाई झालेलीच आहे. आणि त्या राजांना मांडलिकत्व मान्य करावे लागले आहे. दहाव्या शतकात हळेबीड-द्वारसमुद्र येथे होयसळ यादवांचा उदय झाला. हे देवगिरीच्या यादवांचेच भाईबंद होते. पण प्रारंभापासूनच चालुक्यांच्या त्यांच्याशी लढाया सुरू झाल्या. विक्रमादित्य, सोमेश्वर ३ रा, जगदेक मल्ल यांच्या कारकीर्दीत हळेबीडचे होयसळ मांडलिक म्हणून आपल्या सेनेनिशी त्यांच्या साह्याला आले असल्याचे इतिहास सांगतो. या कल्याणीच्या चालुक्यांचे कोरीव लेख, त्यांच्या सत्तेचे उदयास्त यांवरून बदामीचे चालुक्य व राष्ट्रकूट यांच्याप्रमाणेच हेही घराणे महाराष्ट्रीय होते असे दिसून येईल.

देवगिरीचे यादव
 कल्याणीच्या चालुक्यांनंतर देवगिरीच्या यादवांची सत्ता महाराष्ट्रावर प्रस्थापित झाली. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाबद्दल कसलाच वाद नाही. पहिला यादव सम्राट भिल्लम याने ११८७ साली साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या पुढल्याच वर्षी मुकुन्दराजाचा 'विवेकसिंधू' हा मराठीतला आणि अभिमान धरणारा पहिला ग्रंथ अवतरला. यादवांनी मराठीला आश्रय तर दिलाच होता. पण मराठीचे व महाराष्ट्राचे निःसीम अभिमानी जे महानुभावपंथाचे संस्थापक चक्रधर त्यांचे शिष्यत्वही त्यांनी पत्करले होते. मुकुन्दराज, चक्रधर व ज्ञानेश्वर हे मराठी साहित्याचे आद्यपुरुष त्यांच्याच कारकीर्दीत उदयास आले आणि यादवांनी राजसत्तेने व त्यांनी आपल्या वाणीने महाराष्ट्राच्या सीमा व त्याची अस्मिता यांना चिरस्थायी रूप देऊन टाकले. यादवांचे लेख मराठीप्रमाणे कानडीतही आहेत. पण त्यांची राजभाषा मराठी होती. आणि त्यांची कर्मभूमी चालुक्य राष्ट्रकूटांप्रमाणे महाराष्ट्र हीच होती. चोल, पांड्य, कलिंग, तेलंगणाप्रमाणेच कर्नाटकावरही यादवांचे साम्राज्य होते. येथे एक गोष्ट लक्षणीय आहे. म्हैसूर प्रांतातील द्वारसमुद्र - हळेबीड येथील होयसळ यादव हे राज-