पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हवी. सण, समारंभ, उत्सव, स्नेहसंमेलन, सहली, स्पर्धा, पुरस्कार, प्रोत्साहन योजना हवी. सुट्टीच्या कालावधीचे कार्य नियोजन हवे. मुलांना त्यांच्या पहिल्या नावाने ओळखले जावे. कर्मचारी बाबा, काका, मामा, ताई, मावशी, काकी, आजी, दादा इ. नावाने ओळखले जावेत. हे छोटे बदल संस्थेस घर करतील. संस्थांमध्ये रांगोळी, बारसे, वाढदिवस, लग्न, साखरपुडा, ओटी भरणे इ. कार्यक्रमांचे आयोजन करून इतर संस्था/समाज संपर्काद्वारे संस्था समाजशील होईल असे पहावे.
 व्यक्तिगत अभिलेख
 मुलांच्या केस फाईल्स व्यक्तिगत नोंदी, इतिहास, विकास, प्रशस्तीपत्रे, गुणपत्रे, वेळोवेळची छायाचित्रे, प्रगती पुस्तके, पुरस्कार, स्पर्धा प्रावीण्य, स्वभाव, गुणदोष यांची वेळोवेळी नोंद करून अद्यतन केल्या जाव्यात. ती नोंद करणा-यांचे नाव, पद, अधिकार, तारीख, वेळ नोंदवावी. हे अभिलेख मुलांची संपत्ती मानण्यात येऊन त्यांच्या मागणीवरून देण्याची व्यवस्था हवी. कार्यालयीन गुप्ततेसंबंधीचे अभिलेख स्वतंत्र असावेत. ते गोपनीय ठेवावेत.
 सेवायोजन व पुनर्वसन
 बालकांच्या पुनर्वसनाचा विचार जन्म अथवा दाखल दिनी सुरू व्हावा. पुनर्वसन योजनेचा वेळोवेळी आढावा घ्यावा. मुलांच्या पुनर्वसनाचा हक्क मानण्यात यावा. पूर्ण पुनर्वसनाची वैधानिक जबाबदारी संस्थेची मानण्यात यावी. पुनर्वसनोत्तर पाठपुरावा आवश्यक मानण्यात यावा. मुलांच्यात मातृसंस्थेविषयी कृतज्ञता व कर्तव्यभाव जागवण्याचे प्रयत्न व्हावेत.
 समारोप

 असे झाले तर संस्था बालकांची नंदनवने होतील. मुलांना, सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न व्हावा. ज्यांना काही नाही त्यांना सर्व काही हे संस्था समृद्धीचे घोषवाक्य व्हावे. संस्था 'घर' व्हावी हे ध्येय हवे.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...८१