पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. अशा वेळी संगत, अनुकरण इत्यादींमुळे ब-याचदा नको त्या गोष्टी त्यांच्या हातून घडत असतात. व्यसनं जडतात नि पक्की होतात, तीही याच वयात. आपण नटावं, चांगले कपडे घालावे, नाटक सिनेमा पहावे, रस्त्यावरून भटकंती करावी, टोळक्याने टिंगल करावी, अशा किरकोळ आनंदात रमणारी ही मंडळी गुन्हेगार का होतात, हा खरा प्रश्न आहे. या सर्व प्रकारांमागे आपला स्थितीशील समाज, दुराग्रही पालक, हेटाळणारे शिक्षक चीनच्या भिंतीप्रमाणे असे उभे ठाकलेले असतात की संघर्ष व प्रतिक्रियात्मक पावित्र्यास मग पर्यायच राहात नाही.
 आपल्या समाजात तरुणांची उभारलेली आंदोलने जितकी तीव्र असतात तितकीच ती क्षणिकही असतात, असे दिसून येते. मनाचा कोंडमारा युवा पिढीस कधीच सहन होत नसतो. सोशिकतेचे प्रौढत्व त्यांच्यात अपवादानेच आढळत असते. त्यामुळे मनाचा उद्रेक कधी संघर्ष प्रतिक्रियेच्या स्वरूपात तर कधी गुन्हेगारीच्या स्वरूपात प्रकट होत असतो.

 युवा गुन्हेगारीच्या या भयंकर समस्येकडे आपण आजवर फारसे गांभीर्याने पाहिल्याचा पुरावा नाही. युवा गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे ‘बोर्टल स्कूल अॅक्ट' आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो झाला असला तरी त्याची फारशी जाणीवपूर्वक अंमलबजावणी व प्रतिबंधात्मक उपाय आपल्या देशात झाले नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. पाश्चात्त्य समाजसुधारक व युवक मित्र बोर्टल यांनी सर्वप्रथम या कार्याकडे जगाचे लक्ष वेधले. पहिल्या विश्व युद्धानंतर दोस्त राष्ट्रांमधील युवकांची पिढीच्या पिढी प्रतिक्रियावादी व गुन्हेगार बनली होती. बोर्टल यांनी खाजगी शाळा उघडून या गुन्हेगार पिढीस सुधारण्याचे क्रांतिकारी कार्य केले. पुढे सगळ्या जगात त्यांच्या धर्तीवर विद्यालये व सुधारगृहे सुरू झाली पण भारतात मात्र या सुधारगृहांचे स्वरूप ‘मिनी प्रिझन' शिवाय वेगळे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल. बरीच सुधारगृहे ही कारागृहातच असतात. त्यांचा प्रशासन वर्ग हा तुरुंग विभागाचाच असल्याने या युवकांकडे सुधारवादी दृष्टीने न पाहता प्रतिबद्ध गुन्हेगारी म्हणून पाहिले जाते. त्यात चुकून गुन्हा केलेला, संगतीने गुन्हा केलेला अशी वर्गवारी असत नाही. ‘सब घोडे बारा टक्के' या न्यायाने सर्वांना समान वागणूक मिळते. परिणामी सुधारगृहातील युवक गुन्हेगार हे प्रतिबद्ध गुन्हेगार

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...६१