पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतात. भारतात तर गुन्हेगार युवतींसाठी स्वतंत्र सुधारगृहे नसल्याने त्यांना न्यायालयच तुरुंगात धाडत असते.

 युवा वर्षाचा सूर्य अस्ताकडे झुकत आहे. या वर्षाचे विहंगमावलोकन करत असताना आपण एक गोष्ट मान्य करायला हवी की, युवा वर्गाच्या ख-या समस्यांकडे जितक्या गांभीर्याने पाहायला हवे तितके पाहिले नाही. हा लेख प्रपंच आपल्या या प्रमादाकडे लक्ष वेधावे इतक्याच माफक अपेक्षेने लिहिला आहे. प्राध्यापक म्हणून दरवर्षी तरुण-तरुणींशी प्रत्यक्ष व लेखन इत्यादींद्वारे संवाद साधत असताना जे अनुभवले, जाणवले ते लिहिले आहे. याला गुन्हेगारीशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादीची बैठक नसली तरी अप्रत्यक्षरीत्या त्या सर्व घटकांचा विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण युवा गुन्हेगारीकडे पहायला हवे. मादक पदार्थांचे सेवन, लैंगिकता, उच्छृखलपणा, बेफिकिरी इत्यादींमुळे आपण या युवकांना गुन्हेगाराच्या पिंज-यातूनच पाहात आलो आहोत. युवकांकडे भ्रातृभावाने व उदारतेने पाहिल्यास त्यांच्यातील संघर्ष, प्रतिक्रिया, गुन्हे यास ब-याच अंशी पायबंद घालता येईल, असे मला वाटते. यासाठी घर, समाज महाविद्यालये ही संवेदन क्षेत्रे मानून तिथे युवकांशी समादर संवाद जर साधता आला तर त्यांच्यातील सर्व प्रकारच्या दुष्ट वृत्तीचा सहज संहार करता येईल. त्यासाठी पालक, शिक्षक, हितचिंतक पिढीने पूर्वग्रहदूषित वृत्ती झुगारून उदारपणे सहयोगासाठी व समन्वयासाठी पुढे यायला हवे. 'आजचा युवक हा उद्याचा नागरिक' हे सूत्र जर आपण सर्वथैव मानत असून तर प्रगतीशील दृष्टिकोन ठेवण्यास पर्याय असू नये. युवकांचे जे हात उगारण्यासाठी असतात तेच नवं काही उभारूही शकतात यावर आपली अटळ निष्ठा असावयास हवी. या संदर्भात इस्रायलच्या तरुणांचा आदर्श दीपस्तंभाचे कार्य करील. गरज आहे युवकांकडे डोळसपणे पाहण्याची.

६२...युवक आणि गुन्हेगारी