पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युवक आणि गुन्हेगारी


 सन १९८५ हे विश्व युवा वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. सहभाग, विकास आणि शांतता ही या वर्षाची उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. ही उद्दिष्टे ठरवत असताना आजचा काळ व आजच्या युवकांची स्थिती या दोन्हीचा विचार करण्यात आला आहे. युवक कोणाला म्हणावे हे सांगणे तितके सोपे नाही. वय, वृत्ती नि विचारांच्या कसोटीवर युवकाची व्याख्या करत असताना तर ती अधिकच गुंतागुंतीची होत जाते. मॅगसेसे पुरस्कार मिळविणा-या बाबा आमटेंच्या कवी मनाने युवकांची केलेली व्याख्या ‘ज्याच्या तरुण खांद्यावर तरुण मन असतं तो युवक' समर्पक असली तरी तिला सर्वंकष म्हणता येणार नाही. लोकनायक जयप्रकाशांनी ‘धुनी' हे युवकाचं लक्षण मानलंय. ज्याला ध्यास नि ध्येय नाही तो तरुण कसला? युवकांच्या अनेक प्रवृत्त्याही सांगण्यात आल्या आहेत. युवक सुख-साधनांच्या प्रलोभनात गुंतून राहात नाहीत. तो प्रत्यही साहसाच्या शोधात व्यग्र असतो. तो पारंपरिकतेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारतो. जीविकेच्या शोधाची त्याला फारशी तीव्रता नसते. त्याला हवं असतं ते फक्त जगण्याचे प्रयोजन. युवकाच्या या स्वरूप नि वैशिष्ट्यातच त्याचा नि गुन्हेगारीचा संबंध सामावलेला आहे.

 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हेगारांचे वयोमान परत्वे तीन प्रकार मानण्यात आले आहेत. १) बाल गुन्हेगार २) युवा गुन्हेगार ३) प्रौढ गुन्हेगार. १६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुले व १८ वर्षे वयोगटातील मुली यांचा अंतर्भाव बालगुन्हेगार म्हणून करण्यात येतो. १८ ते २२ वयोगटातील गुन्हेगारांना युवा गुन्हेगार समजण्यात येते. उर्वरित गुन्हेगार हे प्रौढ गुन्हेगार समजण्यात येतात. पैकी बाल गुन्हेगार व युवा गुन्हेगार यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जसा सहानुभूतीचा राहिला आहे तसाच तो विधी व न्याय व्यवस्थेचाही आहे. या

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...५९