पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालकांचे हक्क व आपली कर्तव्ये

 बालकांना हक्क ते कसले? ती तर अज्ञानी लेकरं बिचारी! आई-वडिलांनी त्यांना सांभाळायचं. त्यांना काय कळतं मुळी? 'मुकी बिचारी कुणीही हाका!' आपण घेऊ तीच त्यांची काळजी. अशा प्रकारच्या भाबडेपणानं मुलं जन्माला घालण्याचा, वाढवण्याचा काळ आता इतिहासजमा झालाय! आता जगभर मुलांचे हक्क मान्य करण्यात आलेत. त्या हक्कांचे संरक्षण करणे, पालन करणे, ते अमलात आणणे आता आपले कर्तव्य ठरून गेलेय. असले तसले कर्तव्य नाही, अगदी चांगले कायदेशीर कर्तव्य झाले आहे.
 २० नोव्हेंबर, १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून (युनो) व ‘युनिसेफ'च्या पुढाकारातून जगातील ७२ देशांनी ‘बालकांचे हक्क मान्य केलेत. १९९२ साली आपल्या भारतानेही बालक हक्क सनदेवर स्वाक्षरी करून ही जबाबदारी स्वीकारली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकाचा (१९९० ते २०००) कृती कार्यक्रम योजून तो अमलातही आणला गेला आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाज सर्वांनाच बालक हक्क व त्या संदर्भातील आपल्या कर्तव्याचे भान येणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही झाले आहे.

 बालक हक्कांच्या निर्मितीमागे इतिहास आहे तसे तत्त्वज्ञानही. गेल्या शतकाच्या प्रारंभी पहिले महायुद्ध (१९१४ ते १९१८) झाले. त्यात जगातील अनेक देश उद्ध्वस्त झाले. चार वर्षे सतत चाललेल्या या महायुद्धात सुमारे ४० देश प्रभावित झाले. साडेसहा कोटी सैनिकांनी लढलेले हे युद्ध. यात ८० लक्ष सैनिक कामी आले. त्याशिवाय ६६ लक्ष नागरिक मारले गेले. या युद्धानंतरच्या परिस्थितीने युद्धात अनाथ, निराधार, अपंग झालेल्या जगभरच्या लक्षावधी

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१५