पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खलील जिब्रान यांनी 'प्रोफेट'मध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘मुलं ही तुमची नसतात. चिरंजीव होऊ इच्छिणाच्या उत्कट कामनेचे असतात ते कन्यापुत्र. तुमच्याद्वारे ते जन्मले तरी तुम्ही असता निमित्तमात्र, त्यांना प्रेम द्या. तुमचे विचार मात्र नका देऊ. कारण त्यांना स्वतःचे विचार असतात हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यांच्या शरीरासाठी घर जरूर बांधून द्या. आत्म्याकरिता मात्र नको. कारण त्यांचे आत्मे न दिसणाच्या स्वप्न नि भविष्यात असतात... त्यांना तुमच्यासारखे बनवू नका... जीवन मागं जात नाही... भूतकाळात ते रेंगाळतही नाही. तुम्ही धनुष्य आहात. तुमची मुले बाण.' याचं भान जे पालक, संस्था ठेवतात त्यांची मुलं मोठी होतात.

 माणसाचं मोठं होणं, सुखी होणं याचं निश्चित परिमाण असत नाही. सरासरी ठरवता येते. सारासार बुद्धीनंच सारं जोखायचं असतं. घरातील मुलांपेक्षा संस्थेतील मुला-मुलींचं जगणं अधिक पुरुषार्थी असतं. आधाराशिवाय वाढणं नि ‘आधार वड’ होणं यात कमी का हिम्मत असते? हिकमती माणसंच असं जगू जाणोत! ऊन, पावसाची तमा न बाळगता जोजणं, जगणं हे येरागबाळ्याचं काम नाही. तिथे पाहिजे जातीचे. दुःख येते जवाएवढे, बळ मिळते मात्र पर्वताएवढे. संस्थाश्रयी मुलांचं जगणं बिकट वाट वहिवाट खरी पण तीच जगण्याची खरी रीत असते, हे नाकारून कसे चालेल?

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१२७