पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वयात आल्यावर कळलं की ती त्याची जन्मदातीच. त्यानं एका जागेपणी आईचं आईपण नाकारण्याचे धाडस केलं. आज तो दिल्लीसारख्या शहरात मोठा अधिकारी. बायको मिळवती. आईचं कुढत जगणं मी पाहिलं आहे. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच लपला. कर्णाचं अंगराज होणं ती माय भोगू शकली नाही.
 शबाना नर्सिंग करून शासकीय रुग्णालयात नोकरीस लागली. ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाली. संस्थेचा पाश तुटला तेव्हा खोली घ्यावी लागली. ओळख लागली म्हणून हॉस्पिटलच्या एका ‘ब्रदर'ची ओळख घातली. बदल्यात त्यानं 'फादर' व्हायचा आग्रह धरला. निराधार शबानाचा तोच एकमेव आधार होता. तो प्रत्येक संकटाच्या क्षणी 'दत्त' असायचा. आता शबानाला त्याचा ‘शब्द' हेच स्वातंत्र्य असतं. नाही म्हणायला ती जगनिंदा टाळायची म्हणून मंगळसूत्र घालते. रखेलीचं बिरुद टाळायचा आग्रह. पण जन्मभर अंगवस्त्र म्हणूनच जगणं. समाजापेक्षा संस्था बरी असं तिचं म्हणणं मला पटतं.
 अंडी, अळी, कोश नि फुलपाखरू या साच्या अवस्थेतून संस्थाश्रयी मुलं घराघरातील मुलांसारखीच जात असतात. शरीर धर्म, शारीरिक वाढ, मानसिक द्वंद्व, भविष्याची चिंता सारं त्यांना जीवनाचा अटळ भाग म्हणून घरातील मुलांसारखं एक क्रम म्हणून मिळत असतं. फरक असतो संदर्भाचा, संघर्षाचा, स्वीकारण्याचा नि नाकारण्याचाही. क्षमता म्हणाल तर संस्थेतील मुलं अधिक विजीगिषू. ती घरातल्या मुलांसारखी सावलीतली रोपं नसतात. तावून सुलाखून निघालेल्या या बेण्यात पडेल तिथे उगवण्याची ताकत असते. भल्या-बुन्याची जाण घरातील मुलांना आई-वडिलांच्या सांगोवांगीतून येते. संस्थेत सगळ्यात वानवा असते ती संवादाची, व्यक्ती संबंधांची. सूचना हाच तिथे संस्कारांचा राजमार्ग असतो. शिक्षेनेच संस्कार होतो अशी संस्थेतील अधिकारी, कर्मचा-यांची ठाम धारणा असते. दया, माया, संधी असा भाग नसतो.

 घरातील मुलांचं वाढणं म्हणजे ओझं वागवणं असतं. प्रतिष्ठा, नातं, जबाबदारी, कर्तव्यपरायणता, उपकाराची फेड, ऋणाईत राहणं, श्राद्ध-स्मरण करणं, मान देणं हे सारं करणं म्हणजे जगणं. यात स्वातंत्र्यापेक्षा बंधन अधिक. स्वातंत्र्य घेणं म्हणजे कृतघ्न होणं, वाया जाणं समजलं जातं. मी तुम्हाला सांगू? मुलांचं जगणं, वाढणं--मग ते घरी असो वा संस्थेत- निरपेक्ष व्हायला हवं.

१२६...संस्थाश्रयी बालकांचं जगणं