पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली होती "Memorandum by the home office on the conduct of children's homes?" त्यात संस्थेचे प्रकार, आकार, कर्मचारी, साहित्य, उपकरणे, आहार, झोप, मनोरंजन, मुलांचा स्वीकार, त्यांचं त्यांच्या जात-धर्म, परंपरेनुसार संगोपन कसं करायचे, दैनंदिनी, परिपाठ, मुला-मुलींची वैयक्तिक स्वच्छता, कपडेलत्ते, पादत्राणे, खिसा खर्च (पॉकेटमनी) दूरस्थ नातलगांशी संपर्क, भेटी, सुट्टी, पत्रव्यवहार, संस्था संचालनात मुला-मुलींच्या मताचा आदर, सुट्टीचे नियोजन, आरोग्य सुविधा (दैनंदिन डॉक्टर, वैयक्तिक आहार, नियमित वजन, औषधोपचार, आजा-याची खोली), संस्थांतील संरक्षण उपाय (वीज, आग, अपघात) शिस्त, शिक्षण, निवास सोयी, मुलांना निवड स्वातंत्र्य (शिक्षण, आहार, कपडे, केशरचना, मनोरंजन इ.),संस्थेतील मुलं मोठी होण्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाची योजना/ पूर्वविचार) इ. चे इतके सूक्ष्म तपशील लाभार्थी अभिलेख (रेकॉर्ड/कागदपत्रे) इ.चे इतके सूक्ष्म तपशील आहेत की अनाथ मुलांच्या संगोपनाची व्यवस्था घरच्यासारखी झाली पाहिजे. संस्था घर असलं पाहिजे असा आग्रह. आपल्याकडे तुरुंगासाठी मार्गदर्शक पुस्तिका (Jail Manual) आहे. मुलांसाठी (Juveniel Home Manual) का नाही? आपल्याकडे नियम (Rules) आहेत. अंमलबजावणी (Implementation) चे काय? कृतिकार्य श्रम आहे काय? यंत्रणा आहे काय?

 अजून मुला-मुलींच्या संस्थेत परीविक्षा अधिकारी, उपअधीक्षक, साक्षरता शिक्षक, आचारी, पहारेकरी, माळी हीच बाबा आदम जमान्यातली पदं? कोणत्या संस्थेत समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ, पूर्णवेळ डॉक्टर, परिचारिका, सहयोगी कार्यकर्ते नेमलेत? कोणत्या संस्थेत प्रथमोपचार, सलाईन, आजा-याची खोली आहे? टी.व्ही सगळ्या संस्थेत.कारण काळजीवाहकांना तो टाइमपाससाठी लागतोच. नळाला पाणी नसते पण टी.व्ही. कायम दुरुस्त. किती संस्थांमध्ये जनरेटर, इन्व्हर्टर मुलांसाठी आहेत? भारनियमन महाराष्ट्रात सर्वत्र आहे ना? (मुंबई सोडून). मुलांच्या बाजूने व मुलांच्या मनाने जोवर संस्था चालवायचं हृदय (मेंदू नव्हे!) यंत्रणेत विकसित होणार नाही तोवर उपेक्षा, दुर्लक्ष, बलात्कार, समलिंगी संभोग रोज होतच राहणार. संस्था भौतिक समृद्धीचा आपला कार्यक्रम आहे की भावसाक्षरतेचा यावरच तुम्हाला मुलं हाती लागतील ना? नाही तर हाताखालूनच जात राहणार. राज्याचे बाल धोरण, महिला धोरण, अपंग धोरण

१०६...महिला व बालकल्याण संस्थांतील लैंगिक शोषण