पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सेक्शन ९५ नियमामध्ये राजघराण्यातील व्यक्ती व इतर सन्माननीय व्यक्तींना त्यांच्या श्रेणीनुसार विविध समारंभाप्रसंगी द्यावयाच्या अंगरक्षकांची संख्या निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार महाराणी व युवराज यांना ३२ स्वारांचा मान देण्यात आला होता. परंतु समानतेच्या तत्त्वानुसार विविध समारंभाप्रसंगी महाराजांइतकेच अंगरक्षक आपल्याला मिळावेत अशी मागणी करतानाच चिमणाबाईंनी अंगरक्षकांची ही संख्या कशाच्या आधारावर निश्चित करण्यात आली याचीदेखील माहिती मागवली.

 १९०४ मध्ये बडोद्याच्या दिवाणांनी मंजुरी दिलेल्या सैनिकी खात्याच्या टिपणात सर्वप्रथम अंगरक्षकांची ही संख्या निर्धारित करण्यात आली होती. पुढे महाराजांच्या आदेशानुसार प्रकाशित झालेल्या 'कवायती नियमांत हीच संख्या कायम ठेवण्यात आली. महाराणी चिमणाबाईंची समान अंगरक्षकांची ही मागणी अमान्य करण्यात आली असली तरी यातून चिमणाबाईंचा स्त्री- पुरुष समानतेचा आग्रह यातून स्पष्ट होतो. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने पत्रात केलेल्या Dowager (विधवा) महाराणी या उल्लेखावर आक्षेप नोंदवत असा उल्लेख न करण्याची विनंती चिमणाबाईंनी केली होती. त्यांची ही मागणी ब्रिटिश सरकारकडून मान्य करण्यात आली.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १९