पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयही याच वर्षी महाराज जेव्हा सुरू करतात तेव्हा शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या उन्नतीचे महाद्वार उघडतात. इतकी कृतिशीलता सयाजीरावांच्या नंतर एकाही फुले अनुयायाला प्रत्यक्षात आणता आली नाही. पुढे १९०६ मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात महाराज जेव्हा सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करतात तेव्हा तर ते फुल्यांपेक्षाही मोठे क्रांतिकारक ठरतात. कारण या कायद्यात १० वर्षापर्यंतची मुले आणि ८ वर्षापर्यंतच्या मुलींना शाळेत पाठवले नाही तर पालकांना ते दिवसाला एक रुपया दंडाची तरतूद करतात.

 या तरतुदीचा थेट संबंध १८८२ च्या फुल्यांनी हंटर कमिशनसमोर केलेल्या मागणीशी आहे. कारण ही मागणी करत असताना फुल्यांनी पालकांना दंड करून पालकांकडून जमा होणारा दंड बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करावा अशीही मागणी केली होती. १९०६ च्या १ रुपयाचे आजचे मूल्य २५०० रु. भर हे वाचून आज आपण यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु यातून शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे ही बाब महाराज किती गंभीरपणे घेत होते याचा साक्षात्कार होतो. फुल्यांची मागणी आणि सयाजीरावांची कृती यांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा फुल्यांना गुरू मानणाऱ्या इतर सर्व समाजक्रांतिकारकांच्या सयाजीराव किती पुढे होते याचा पुरावा मिळतो.

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / ९