पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राप्त झाले. या ग्रंथाच्या प्रकाशनाला सयाजीरावांनी आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे संपादक असणाऱ्या दीनबंधू पत्रात क्रमशः प्रकाशित झाले होते. परंतु फुलेंनी या ग्रंथात भारतातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीसाठी भारतातील ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच ब्रिटिश सरकारवरही सडकून टीका केली होती. ब्रिटिश सरकारचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून सत्यशोधक असणाऱ्या लोखंडेंनी या ग्रंथाचे क्रमशः प्रकाशन बंद केले होते. या पार्श्वभूमीवर तर सयाजीरावांचे उघडपणे या ग्रंथाला अर्थसाहाय्य करणे किती हिमतीचे होते हे आपल्या लक्षात येईल. नुकताच राज्यकारभार हाती घेतलेल्या अवघ्या २० वर्षाच्या राजाने कारकीर्दीच्या आरंभीच इंग्रजांशी थेट भिडण्याची ही कृती अतिशय महत्त्वाची आहे. महात्मा फुल्यांच्या संदर्भाने गेली ६० वर्षे संशोधन-लेखनाचे पीक उदंड झाले असता फुल्यांच्या एकाही अभ्यासकाने सयाजीरावांच्या या कृतीचे मोल लक्षात घेतले नाही.

 १९ ऑक्टोबर १८८२ रोजी महात्मा फुले हंटर कमिशनसमोर बहुजनांच्या शिक्षणासंदर्भात मागणी करत होते. त्याच वर्षी सयाजीराव अस्पृश्य आणि आदिवासींसाठी मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि वसतिगृहाच्या सोयीसह उपलब्ध करून देऊन फुल्यांच्या मागणीबरोबर कृतीचे पाऊल टाकत होते. इतकेच नव्हे तर स्त्रीशिक्षिका तयार करण्याच्या उद्देशाने

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / ८