पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शाळांमधील शिक्षकांना शारीरिक शिक्षण देण्यासाठी श्री. ए. व्ही. वैद्य यांची बडोदा प्रांताचे शारीरिक शिक्षण निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 १९२० मध्ये महाराजांनी कोणत्याही व्यायामशाळेत व्यायाम शिकविणारा शिक्षक नियमित काम करीत असल्यास त्यांना दरमहा २० रुपये मानधन देण्याचा आदेश दिला. प्रत्येक व्यायामशाळेला व्यायामाच्या उपकरणांच्या खरेदीसाठी निम्मा खर्च देण्यास सुरुवात केली. परंतु ती रक्कम ५० रु. पेक्षा अधिक असू नये अशी अट घालण्यात आली. तर व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ५०० रु. पेक्षा कमी असणारा निम्मा खर्च मदत म्हणून देण्याचा हुकूम सयाजीरावांनी दिला. त्याचबरोबर पोहण्याचा हौद बांधण्याकरिता ५०० रु. पर्यंत मदत देण्याचा निर्णय सयाजीरावांनी घेतला.

 राष्ट्र उभारणीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या युवकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी सयाजीरावांनी महाविद्यालयीन विद्यार्थांना शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्याकडे पाऊले उचलली. १९२५-२६ मध्ये बडोद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षण व शारीरिक शिक्षण देण्यासाठी सयाजीरावांनी प्रो. टनेर या परदेशी तज्ञांना आमंत्रित केले होते. १९३१ मध्ये बडोदा कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले, तर पुढील वर्गातील विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शारीरिक शिक्षण दिले जाई.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २०