पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीत उपचार
 सयाजीराव महाराजांना पहिल्या राणी चिमणाबाईंच्या मृत्यूनंतर निद्रानाशाचा आजार जडला. त्यावर अनेक उपाय करूनही फारसा उपयोग झाला नाही. परंतु कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव यांचे गाणे ऐकून महाराजांना चांगली झोप लागू लागली. लक्ष्मीबाईंच्या या कामगिरीमुळे दुसऱ्याच दिवशी त्यांची बडोदा दरबारी गायिका म्हणून नेमणूक करण्यात आली. रुग्णांना दवाखान्यात संगीत ऐकवले तर त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ शकेल या गृहीतकानुसार बडोद्याच्या हॉस्पिटलमध्ये फय्याज खाँ यांना गायन करण्याचे आदेश महाराजांनी दिले. संगीताचा रुग्णाच्या आरोग्याशी संबंध जोडून महाराजांनी एक अभिनव प्रयोग केला.
आरोग्यदायी कायदे

 स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि त्यांच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असलेली बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी सयाजीरावांनी १९०४ मध्ये 'बालविवाह प्रतिबंधक कायदा' केला. बाळाच्या जन्मावेळी दाई हजर असण्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि दाई प्रती असणारा निष्काळजीपणा व केले जाणारे दुर्लक्ष यावर मात करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९१९ रोजी बडोद्यात 'दाई कायदा' लागू करण्यात आला. १९३२ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात 'माता कल्याण कायदा' अमलात आणला. १९२९ ला मुंबई प्रांतात

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १५