पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोग्य प्रबोधन

 डॉ. बालाभाई यांनी नियुक्त केलेल्या कमिटीद्वारे रुग्णवाहिका, नर्सिंग व घरगुती आरोग्यशास्त्राचे वर्ग आणि परीक्षा यांचे नियम निश्चित केले जात. या कमिटीने केलेले नियम बडोदा सरकारकडून मान्यताप्राप्त असत. १९०१ पासून बडोदा जिल्ह्यात आणि बडोदा शहरात रुग्णवाहिकेवर व्याख्यान व रुग्णालयाच्या संदर्भात मिलिटरी व पोलिसांचे नियमित वर्ग सुरू केले. १९०६ ला 'कौंटेस ऑफ डफरीन' रुग्णालयात दोन रुग्णवाहिका वर्ग होते. या वर्गाची उपस्थिती ११५ होती तर ५६ उमेदवार या रुग्णवाहिकेच्या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ४१ पास झाले. बडोदा येथे घरगुती आरोग्यशास्त्राचा नियमित वर्ग होता. 'कौंटेस ऑफ डफरीन' हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिमी या वर्गात व्याख्यान देत असत. बडोदा, पाटण, नवसारी आणि अमरेली ही ठिकाणे या विषयाच्या परीक्षेची केंद्रे होती. १९११-१२ साली 'पाण्याचा वापर व गैरवापर', 'हवा आणि प्रकाश’, ‘डास आणि मलेरिया' या विषयांच्या बरोबरीने घरगुती आरोग्यशास्त्रावरील १० व्याख्याने देण्यात आली. १९१३ साली डॉ. कुपर यांनी पेटलाड येथे 'आरोग्याचे नियम, नवसारी येथे 'मानवी सामर्थ्य', मेहसाणा या ठिकाणी 'आरोग्य आणि त्याचे महत्त्व' आणि बडोदा येथे 'मलेरिया' या विषयांवर व्याख्याने दिली.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १४