पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदू पुरोहित कायद्याची 'पूर्वतयारी'
 सयाजीरावांनी बडोद्यात लागू केलेला हा क्रांतिकारक कायदा समजून घेण्याअगोदर महाराजांनी राबविलेले अफाट धर्मसुधारणा कार्य समजून घ्यावे लागते. कारण धर्मसुधारणांच्या क्षेत्रात महाराजांनी जे मुलभूत काम हा कायदा करण्याअगोदर ३० वर्षे करून ठेवले होते त्यातून या कायद्याला भक्कम पाया लाभला. त्यामुळेच तो यशस्वी झाला.

 १८७७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी सयाजीरावांनी अहमदाबाद येथे सहभोजन करून अस्पृश्यता निवारणास सुरुवात केली. १८८३ मध्ये स्वत:च्या राजवाड्यातील खंडोबाचे खाजगी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. हे पाऊल उचलणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक ठरतात. राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजण्यासाठी या विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी २३ नोव्हेंबर १८८६ रोजी हु.हु.नं. ५० अन्वये राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. रा. रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्यावर ते पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सयाजीरावांच्या आज्ञेवरून या तिघांनी धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा 'ऐनेराज मेहेल' नावाचा ग्रंथ तयार केला.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / ८