पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातील पहिला मराठा पुरोहित वर्ग
 १८९६ मध्ये बडोद्यात मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू झाला. यानंतर २१ वर्षांनी याचे अनुकरण १९१७ मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेदोक्त पाठशाळा सुरू करून केले. १८९१ ते १८९६ अशी ६ वर्षे आपला 'गृहपाठ' पक्का करून मे १८९६ मध्ये मसुरी स्वारीतून सयाजीरावांनी वेदोक्तासंदर्भातील हुकूम काढला. त्यानुसार १५ ऑक्टोबर १८९६ पासून म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापासून राजवाड्यातील सर्व धार्मिक कार्ये वेदोक्त पद्धतीने सुरू करण्यात आली. १८९८ मध्ये वेदोक्त विधीनुसार राजकुमारांच्या मुंजी घडवून महाराजांनी पुढचा टप्पा गाठला. राजकुमारांच्या मुंजी वेदोक्त पद्धतीने केल्यानंतर त्या विधींचे हेतू व अर्थ समजून घेण्यासाठी सयाजीराव महाराज स्वतः रियासतकार सरदेसाईंकडे दोन ते तीन वर्षे संस्कृत शिकत होते.

 वेदोक्ताचा हुकूम काढण्याअगोदर ३ महिने वीडन यांना लिहिलेल्या पत्रात या संदर्भातील स्वतः ची भूमिका स्पष्ट करताना महाराज म्हणतात, “अलीकडे काही दिवस मी वेदोक्त आणि पुराणोक्त या दोन धर्मविधींसंबंधी माहिती गोळा करीत आहे. त्यापैकी सामाजिकदृष्ट्या वेदोक्त पद्धती ही श्रेष्ठ मानली जाते. व्यक्तिशः या दोन्ही पद्धतींत मला स्वतःला कमीअधिकपणा काहीच वाटत नाही. परंतु लोक मात्र पहिलीला अधिक महत्त्व देतात,म्हणून मी ही सुधारणा हाती घेतली आहे. लोक जर

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / ११