पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांनी १५ फेब्रुवारी १८८२ मध्ये गणपतराव महाजन यांना खानगी कारभारी पदावरून हटवून त्यांच्या जागी रावजी विठ्ठल पुणेकर यांची नेमणूक केली; परंतु अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांच्या जागी १८८४ ला जयसिंगराव आंग्रे यांना फलटण संस्थानच्या कारभारी पदावरून आणून आपल्याला अपेक्षित सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पुढे २ वर्षाने आंग्रेच्या जागी महाराजांचे पहिले शिक्षक केशवराव पंडित यांची नेमणूक केली. यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जागी दोराबजी पेस्तनजी या फारशी गृहस्थाची नेमणूक केली. खानगी कारभारी पदावर इतक्या कमी कलावधीत एवढ्या व्यक्तींच्या केलेल्या नेमणुकांवरून खानगी कारभाराला शिस्त लावण्यासाठी सयाजीरावांनी केलेल्या प्रयत्नांची कल्पना येते.

 ज्या काळात परदेशप्रवास एक प्रकारे 'धर्मद्रोहच' मानला जात होता. त्या काळात (१८८४) सयाजीरावांनी आपले बंधू संपतराव गायकवाड व खासेराव जाधव यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यांच्याबरोबर संस्थानातील अधिकारी वासुदेव समर्थ आणि संपतरावांचे सासरे बापूसाहेब घाटगे यांनाही पाठवले. यादरम्यान बापूसाहेब घाटगेंचा परदेशातच मृत्यू झाला. त्यामुळे महाराजांच्या या निर्णयावर कुटुंबातून, शास्त्रीपंडितांकडून प्रचंड टीका झाली; परंतु याकडे दुर्लक्ष करून महाराजांनी शांतपणे आपल्या सुधारणांचा अंमल सुरू ठेवला. यानंतर महाराजांचा पहिला युरोप दौरा २९ मे १८८७ ते २१ फेब्रुवारी १८८८ या दरम्यान झाला.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ९