पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी जेव्हा पहिल्या युरोप दौऱ्यावर जाण्याचे ठरवले तेव्हा त्यांचे नातेवाईक, नोकरचाकर त्यांच्याबरोबर जाण्यास तयार नव्हते. धर्मशास्त्रानुसार परदेशगमन निंद्य मानले जात असल्याने धर्मशास्त्राची प्रतिकूलता आणि परत आल्यानंतर स्वात दाखल होण्यास अडचण अशी कारणे पुढे करण्यात आली. यावेळी महाराजांना त्यांच्याबरोबर परदेशात नेण्यास आवश्यक असणाऱ्या लोकांचे मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. त्याचप्रमाणे परदेशातून आल्यावर धर्माच्या संबंधाने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारकडून मदत देण्याची हमी द्यावी लागली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराजांनी ही परदेशवारी करून आपला हेतू साध्य केला. परदेशातून परत आल्यानंतर मात्र महाराजांना आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांना प्रायश्चित्त घ्यावे लागले. परंतु याबाबत कोणतीही खळखळ न करता महाराजांनी शांतचित्ताने प्रायश्चित्त घेतले. या प्रायश्चित्तानंतर प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून महाराजांनी भिकाचार्य ऐनापुरे यांच्याकडून १९०३ च्या हुकुमाद्वारे 'प्रायश्चित्तमयूख' हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर प्रकाशित केले. सयाजीरावांचे हे प्रायश्चित्त धर्माबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठीच्या प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १०