पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८) सुधारित अवजारांचा पुरवठा करणाऱ्या संस्था

बडोद्यात एकूण नावीन्यपूर्ण अशा वरील ५८ प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत होत्या. सहकारचा असा व्यापक विकास त्या काळात ब्रिटिश प्रांत, संस्थानेच काय तर स्वातंत्र्यानंतरच्या भारतात आजही झाल्याचे आढळत नाही.

बडोदा सहकाराचा सयाजीमार्ग

 १८८५ मध्ये बडोदा संस्थानातील गणदेवी येथे आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. १९०४ चा ब्रिटिश सहकार कायदा पास होण्यापूर्वी बडोद्यात १८८९ साली प्रा. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांच्या प्रयत्नाने 'अन्योन्य सहकारी मंडळीच्या रूपाने भारतातील पहिली सहकारी बँक स्थापन झाली होती. १९०५ साली ब्रिटिश भारत सरकारच्या धर्तीवर बडोद्यामध्ये सयाजीरावांनी सहकार कायदा मंजूर केला.

 महाराजांनी अमेरिकन अर्थतज्ञ व्हाईटनॅक यांच्या मार्गदर्शनाखाली १९०८ साली बडोदा बँकेची स्थापना केली. संपूर्ण भारतात शेतकऱ्यांना सर्वात कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था केली. १९०८ मध्ये सयाजीरावांनी स्थापन केलेली ही भारतीय संस्थानातील पहिली सहकारी बँक आज ११२ वर्षानंतरही अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे. समकालीन भारतातील 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून ती नावारूपास आली आहे. बडोद्यातील सहकारी संस्थांचे जाळे पसरविताना महाराजांनी विकेंद्रीकरणावर विशेष भर दिला.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४७