पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तींमागे एक प्राथमिक सहकारी संस्था अस्तित्वात होती. यावरून सयाजीरावांनी तत्कालीन बडोद्यात साधलेला सहकार चळवळीच्या विकासाचा टप्पा गाठणे सहकार चळवळीची पंढरी असणाऱ्या महाराष्ट्राला आजही जमले नसल्याचे स्पष्ट होते.

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील सहकारी कृषी संस्थांची संख्या

 कृषी हकारी संस्थांच्या सभासद संख्येचा विचार करता मद्रास प्रांतात सर्वाधिक ६,७५,००० इतके कृषी सहकारी संस्थांचे सभासद होते. मद्रासमधील एका कृषी संस्थेची सरासरी सभासद संख्या ५४ इतकी होती. त्याखालोखाल अनुक्रमे ३,२२,००० व १,६५,००० सभासद संख्या असणाऱ्या मुंबई प्रांत व त्रावणकोर संस्थानात एका कृषी सहकारी संस्थेची सरासरी सभासद संख्या अनुक्रमे ६७ व ११७ इतकी होती. कृषी सहकारी संस्थांचे ७२ हजार सभासद असणाऱ्या म्हैसूर संस्थानात हे प्रमाण प्रत्येक कृषी सहकारी संस्थेमागे ४१ सभासद इतके होते. तर सर्वात कमी १२,००० सभासद संख्या असणाऱ्या कोचीन संस्थानात ८६ सभासदांमागे एक कृषी सहकारी संस्था होती. या पार्श्वभूमीवर २८ सभासदांमागे एक कृषी सहकारी संस्था अस्तित्वात असणाऱ्या बडोदा संस्थानात कृषी सहकारी संस्थांचे जाळे सर्वसामान्य शेतकरी वर्गांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३८