पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले व त्याच्या नावात बदल करून त्याचे नामकरण 'कृषी व सहकार' असे करण्यात आले. हा सयाजीरावांच्या समन्वयवादी धोरणाचा परिणाम होता. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर क्रांतिकारक ठरलेल्या सहकार चळवळीची व कृषी-औद्योगिक धोरणाची पायाभरणी सयाजीराव महाराजांनी बडोद्यात केली होती हे दुर्दैवाने महाराष्ट्राला अज्ञात आहे.

 १९१७-१८ मध्ये सहकारी संस्थांमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत सयाजीरावांनी सहकार खात्याला आदेश दिले. या आदेशाचे पालन करत सहकार खात्याने मेहसाना व अमरेली या ठिकाणी दोन प्रशिक्षणवर्गाचे आयोजन ऑक्टोबर व मे महिन्यात केले. या प्रशिक्षणवर्गात सर्व सहकारी संस्थांमधील सचिव, मानद आयोजक, तजवीजदार, पेढीचे मुनीम सहभागी झाले होते. या प्रशिक्षणवर्गाचे आयोजन व सहभागींना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सहकार खात्याचे निबंधक श्री. पगार आणि श्री. अधिकारी यांनी पार पाडली.

 सयाजीरावांनी सहकार चळवळीबाबतची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी सहकार खात्याचे अधिकृत मुखपत्र 'ग्रामजीवन' सुरू करण्यात आले होते. या मुखपत्राच्या माध्यमातून सहकार खात्याचे निर्णय व सहकार विषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात होती. 'ग्रामजीवन' बरोबरच 'शेती आणि सहकार्य' या त्रैमासिकातून सहकाराची माहिती प्रसारित करण्यात आली. या मासिकाच्या प्रभावामुळे

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३२