पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्मचारी होते. १९३८ मध्ये बडोद्यातील भंगी सहकारी संस्थांचे एकूण खेळते भांडवल ४५,८७२ रुपये व सभासद संख्या ६४१ होती. भंगी सहकारी संस्था सुरू करणारे भारतातील आजवरचे एकमेव प्रशासक असावेत. ही संस्था सुरू करून महाराजांनी सर्व समाज घटकांना समान दर्जा देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला असल्याचे स्पष्ट दिसते.

५) दुभत्या जनावरांसाठीच्या सहकारी संस्था

 बडोद्यात १९२७-२८ मध्ये पाद्रा तालुक्यातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने 'विशेष आर्थिक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर बडोदा संस्थानात २७ दुभत्या जनावरांसाठीच्या संस्थांची नोंदणी करण्यात आली.

 या संस्थांना सरकारतर्फे दीर्घ मुदतीची कर्जाची हमी देण्यात आली. दीर्घकालीन कर्जपुरवठा धोरणानुसार १९२७-२८ मध्ये यातील दहा संस्थांना २३ हजार ७०० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. दुभत्या जनावरांसाठीच्या सहकारी संस्था आणि पशुसंवर्धन संस्थांना सातत्याने आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देऊन सयाजीरावांनी बडोद्यातील दूध व्यवसायाच्या वाढीकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २२