पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत करणे हा अन्योन्य साहाय्यकारी संस्थेचा मुख्य उद्देश होता. १९१५-१६ मध्ये अन्योन्य सहकारी मंडळीची सभासद संख्या १५८ वरून २०० वर पोहोचली. संस्थेचे खेळते भांडवल ३८,३९३ रु. वरून ४८,९०५ रु. पर्यंत वाढले. तर सभासदांच्या ठेवींची रक्कम ३४,२७२ रुपयांवरून वाढून ३८,७७५ रु. इतकी झाली.

२) पूर निवारण संस्था

 १९२७ मध्ये बडोदा संस्थानात आलेल्या महापुरात हानी झालेल्या जनतेच्या घरांची पुनर्बांधणी व इतर मदतीसाठी पूर निवारण संस्थेची सहकारी तत्त्वावर बडोदा शहरात सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारची संपूर्ण भारतातील ही पहिली संस्था होती. बडोद्यात अशा ४० पूर निवारण संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी २२ संस्था अस्पृश्य जातीबहुल भागात गृहनिर्माणाचे काम करत होत्या. या २२ संस्थांची सभासद संख्या ६३७ इतकी होती.

 या संस्थांच्या आर्थिक मदतीसाठी १ लाख ६ हजार रुपयांच्या कर्जाची तरतूद करण्यात आली. अस्पृश्य जातींचे वास्तव्य बडोदा शहराच्या अत्यंत सखल भागात होते. अशा परिस्थितीत पुरामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रदेशात गृहनिर्माणाच्या कामांना अधिक गती देण्यात आली. गृहनिर्माणाबरोबरच रस्ते व गटारे बांधकामाची कामे देखील मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. पुरासारख्या नैसर्गिक

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २०