बालपण
भाऊसाहेब म्हणून संबोधले जाणाऱ्या रामचंद्र विठोबा धामणस्कर यांचा जन्म १८४८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात भालावली (आजोळी) येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण रत्नागिरीस गेले. ते ५ वर्षाचे झाल्यानंतर त्यांना शाळेत घातले. परंतु ते नियमितपणे शाळेत जात नसत. काहीतरी ढोंग करून ते शाळेमध्ये जाण्याचे टाळत असत. यासंदर्भातील एक गमतीदार गोष्ट नमूद करावीशी वाटते. बऱ्याच वेळा भाऊसाहेब सकाळी उठून शाळेत जाण्यापूर्वी शाळेत जायला लागू नये म्हणून अंगात भूत संचारल्याचे ढोंग अशाप्रकारे करत की घरच्यांना ते खरे वाटे व त्यांचे शाळेत जाणे रद्द व्हायचे.
एके दिवशी तर त्यांच्या आई-वडिलांनी एका भूतवैद्याला बोलावून भाऊसाहेबांची अवस्था दाखवली. त्या भूतवैद्यालाही ते ढोंग खरे वाटून त्यांच्या अंगातले भूत काढून टाकण्यासाठी काही मंत्र-तंत्र केले. मंत्र-तंत्राने भूत जाईना म्हणून मिरचीची धुरी दिली परंतु तीसुद्धा भाऊसाहेबांनी मोठ्या निग्रहाने सहन केली. असा निग्रहीपणा व सहनशक्ती त्यांच्या अंगी लहानपणापासूनच असल्याचे आपणास पाहावयास मिळते. निग्रहीपणा आणि सहनशीलता हे दोन विशेष गुण लाभलेल्या धामणस्करांनी लहानपणी प्रयत्नपूर्वक रूक्ष वाटणाऱ्या गणित व इंग्रजी विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले.
पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / ९