पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रत्येक थोर पुरुषांच्या आयुष्यात कधी-कधी असा एखादा प्रसंग येतो की, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाते. असाच एक प्रसंग भाऊसाहेबांच्या आयुष्यात आला ज्यामुळे ते नित्यनियमाने शाळेत जाऊ लागले. एकदा त्यांना त्यांच्या वडिलांनी एक नवी पाटी आणून दिली. त्यावर जांभळ्या रंगाचे डाग होते. ते पाहून त्यांना मजा वाटली. त्यांना ती इतकी आवडली की ती घेऊन ते तासनतास बसू लागले. त्यामुळे त्यांची उजळणी पाठ होऊन ते अंकगणितामध्ये प्रवीण झाले. भाऊसाहेब हुशार असल्यामुळे त्यांना कोणताही विषय एकदा समजून सांगितला की पक्का लक्षात राहात असे. त्यांची स्मरणशक्ती अप्रतिम होती. एकदा पाठ केलेले ते कधीही विसरत नसत.

 इतिहास, भूगोल यासारखे विषय तर ते चुटकीसरशी पाठ करत. त्यांच्या स्मरणशक्तीमुळे शाळेत त्यांचे नाव 'एकपाट्या ' असे पडले होते. त्यांच्या या स्मरणशक्तीविषयी येथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. एकदा रत्नागिरीस मॅट्रिक्युलेशनच्या वर्गात असताना भाऊसाहेबांनी अनेक संदर्भ पुस्तकांच्या आधारे 'आरोग्य' या विषयावर निबंध लिहिला होता. तो सगळा मुखोद्गत करून तिथल्या सभेमध्ये व्याख्यान रुपाने सादर केला. त्यांचे ते सादरीकरण आणि अस्खलित मराठी बोलणे अध्यक्षांना एवढे आवडले की त्यांनी त्यांच्या शिक्षकांजवळ भाऊसाहेबांचा 'रत्नागिरीचे डेमॉस्थेनीस' (अथेनियन राजकारणी वक्ते) असा गौरव केला.

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / १०