Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव


आणि


सत्यशोधक चळवळ


 भारतीय आधुनिकतेच्या परिप्रेक्षात विचार करता धार्मिक आणि सामाजिक सुधारणेला सर्वात क्रांतिकारक योगदान देणारे तत्वज्ञान निर्मितीचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. कारण जात आणि स्त्री- दास्य या भारतीय विषमतेच्या दोन आविष्कारांचा हिंदू धर्म संस्थेशी असणारा संबंध केंद्रस्थानी ठेवून हिंदू समाजातील सामाजिक समतेच्या निर्मितीसाठी महात्मा फुलेंनी वैचारिक आणि कृतिशील योगदान दिले होते. फुलेंचे तत्वज्ञान आणि त्यांची सत्यशोधक चळवळ यांनी आधुनिक भारतातील समतावादी चळवळींना ऊर्जा पुरविली होती. सांस्कृतिक क्रांतीसाठी आवश्यक असणारे वैचारिक अधिष्ठान ग्रंथ लेखनाद्वारे फुलेंबरोबरच शेकडो सत्यशोधकांनी गेली १६५ वर्षे अविरतपणे पुरवले आहे. सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास जी. ए. उगले यांनी लिहिला. हे त्यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला मौलिक योगदान ठरेल. लातूरच्या डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी सत्यशोधकी साहित्याचा इतिहास दोन खंडात लिहून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उगले किंवा गुंदेकरांचे हे लेखन फक्त चाळले तरी सत्यशोधक चळवळ व साहित्याची परंपरा केवढी मोठी आहे याचा उलघडा होतो.

 या पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले आणि त्यांची सत्यशोधक चळवळ यांचा इतिहास फारच रोमहर्षक आहे. कारण सयाजीराव आणि महात्मा फुले यांच्यातील नाते फारच वेगळे होते. १८८३ ते १८९० या ७ वर्षांच्या काळात महात्मा फुले आणि सयाजीराव यांचा प्रत्यक्ष संपर्क होता. या कालावधीत फुलेंचे बडोद्याला सातत्याने जाणे-येणे होते. यादरम्यान एकदा फुले बडोद्यात ३

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ६