पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सावित्रीबाई फुले


यांना फार वाईट दिवस आले. त्यांना खाण्याकरता व यशवंताचे शिक्षणाकरिता बिलकुल पैसा नव्हता. ही गोष्ट तात्यांच्या मित्रांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या कानावर घातली. तेव्हा महाराजांनी काही रक्कम सावित्रीबाई यांचेकडे पाठविली होती त्या रकमेवर बरेच दिवस त्यांनी जुगताईने आपला उदरनिर्वाह व यशवंताचे शिक्षण चालविले होते."

 सयाजीरावांनी केलेल्या मदतीमुळेच फुलेंच्या पश्चात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई आणि मुलगा यशवंत सन्मानपूर्वक आयुष्य जगू शकले याची साक्ष वाघोलेंची ही आठवण देते. १८९७ मधील प्लेगच्या साथीत आपला जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. यशवंतचे सुरुवातीचे शिक्षण सयाजीरावांच्या आर्थिक पाठबळावरच झाले होते. महात्मा फुलेंना त्यांच्या वैचारिक वाटचालीत सक्रीय पाठिंबा देणाऱ्या 'बडोद्या' ने हीच भूमिका सावित्रीबाईबाबतही निभावली. १८९२ ला ‘बडोदावत्सल' प्रेसने सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह प्रकाशित केला. फुले दाम्पत्याच्या वैचारिक आयुष्यात 'बडोद्या'ने पुरवलेल्या खंबीर आधाराचा हा इतिहास आजवर 'अंधारात राहिला.

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ११