पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा प्रकारचे भारतातील आजवरचे हे एकमेव अध्यासन आहे. १९१८ मध्ये ‘गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड फिलॉसॉफी' या तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या जगातील पहिल्या संशोधन ग्रंथमालेची सुरुवात केली.

 धर्माचा तुलनात्मक अभ्यास करताना इतर धर्मीयांना संस्कृत भाषेतील धर्मग्रंथ कळावेत यासाठी महाराजांनी संस्कृत शिक्षण आणि ग्रंथांचे भाषांतर यांच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या अभ्यासाला चालना दिली. यामागील महाराजांची दृष्टी वैश्विक मानव कल्याणाची होती. विविध धर्मातील साम्य आणि भेद आपल्याला कळतील आणि स्वधर्म श्रेष्ठत्वाची भावना गळून पडेल, परिणामी परधर्म द्वेषाचे विष कमी होईल आणि संवादाच्या संधी निर्माण होतील हे महाराजांचे धर्मचिंतन त्या कालखंडपेक्षा आजच्या कालखंडात जास्त आवश्यक आहे. हाच विचार संस्कृत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडताना महाराज म्हणतात, “पाश्चिमात्य लोकांप्रमाणे तुलनात्मक व विवेचक पद्धतीने आपण भाषेचे व तिच्याद्वारे समजणाऱ्या विषयांचे अध्ययन केले पाहिजे. आपली संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती या दोहोंमधील सुंदर व संग्राह्य गोष्टींचे मधुर संमेलन आपण केले पाहिजे आणि पूर्व ती पूर्व व पश्चिम ती पश्चिम; या दोघींचा मिलाफ कधीही होणार नाही. हे वचन जे नेहमी कानावर पडते ते खोटे पाडले पाहिजे.”

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १९