पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूमिकेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराजांनी १९१५ रोजी बडोद्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. हिंदू धर्मातील सर्व जातींना संस्थांनी खर्चाने संस्कृत शिक्षणाची सोय करण्यात आली. बडोद्यातील संस्कृत शाळांमध्ये वेद, व्याकरण, तर्क, धर्मशास्त्र, वेदांत व पुराणे यातील तत्वज्ञानाचे शिक्षण दिले जात होते.
 १८८१ मध्ये बडोद्यातील संस्कृत शाळांची संख्या ११ तर विद्यार्थी संख्या २८९ इतकी होती. १९१३ ते १९२५ च्या दरम्यान शाळांची संख्या सरासरी १० ते १५ च्या दरम्यान होती तर विद्यार्थी संख्या ४०० होती. महाराजांनी १९२९ मध्ये 'भारतीय संस्कृती' या विषयाशी संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २,००० रुपयांची मदत पॅरिस विद्यापीठाला दिली. आजच्या रूपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे ५० लाख ७६ हजार रु. हून अधिक भरते. यावरुन संस्कृत शिक्षणाची बडोद्यातील व्याप्ती लक्षात येते.
तुलनात्मक धर्मअभ्यास

 १९१६ रोजी सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये केंब्रिज विद्यापीठातील विद्वान प्रा. जे. ए. विजेरी यांच्या नेतृत्वाखाली तत्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाचे अध्यासन सुरू केले. या अध्यासनात हिंदू, इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन आणि जगातील अन्य धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला जात होता.

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १८