पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्रोक्त माहिती देणारा ग्रंथ लिहिण्याचा आदेश भिकाचार्य ऐनापुरे यांना दिला. या आदेशानुसार ऐनापुरे यांनी लिहिलेला ‘प्रायश्चित्तमयूख’ हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर १९१४ मध्ये सयाजीरावांनी प्रकाशित केले. १८८८ च्या प्रायश्चित्तानंतर प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्म सुधारणा अभियानाचा उत्तम नमूना आहे.
क्रांतिकारी कायद्याची निर्मिती

 प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांची एकाधिकारशाही वाढलेली आज आपल्याला पहावयास मिळते. बडोद्यातील धार्मिक क्षेत्रातील अंधाधुंदीचा कारभार थांबण्यासाठी महाराजांनी श्रावणमास दक्षिणेच्या माध्यमातून धर्मसुधारणेस सुरवात केली. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच दक्षिणा देण्याचा नियम सयाजीरावांनी केला. यातून श्रावणमास दक्षिणेवरील खर्चात बचत झाली. या बचतीतून बडोद्यात श्रावणमास दक्षिणा फंडातून दरसाल १०,००० रुपये धर्मशास्त्रावरील पुस्तकांचे भाषांतर करण्यासाठी देण्यात येत असत. याच प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणून पुरोहित कायद्याकडे पाहता येईल. हा कायदा १९९५ मध्ये लागू केला असला तरी सयाजीरावांनी १९११ पासून त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती.

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १४