पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मला मिळाला. राजवाड्यात होणारे विधी सर्वांचे मूळ अर्थ व हेतू महाराजांनी मजकडून समजून घेतले. त्यासाठी दोन-तीन वर्ष पावेतो मी महाराजांना संस्कृत शिकवीत होतो." एखादा कायदा जनतेसाठी लागू करण्याआधी स्वतः त्याचा अभ्यास करण्याची महाराजांची अभ्यासू वृत्ती यातून दिसून येते.
 वर्षानुवर्षे पुराणोक्त पद्धतीने होणाऱ्या धार्मिक कार्याविषयी महाराजांनी माहिती घेऊन त्यासाठी राजारामशास्त्री टोपले यांच्याजवळ गीतापठण करून धार्मिक प्रश्नांवर चर्चाही केली. पुढे ब्राह्मण शास्त्री वेदोक्ताची टाळाटाळ करतात हे पाहून महाराजांनी आप्पासाहेब मोहिते या मराठ्याची खानगी कारभारी म्हणून नियुक्ती केली आणि १८९६ साली दसऱ्याच्या दिवसापासून धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने सुरू केले; परंतु या कार्यास महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी नाकारून राजवाड्यावरील भोजनावर बहिष्कार टाकला. त्यांच्याऐवजी गुजराती ब्राह्मण आणि इतर जातीतील अनाथ, दुर्बल लोकांना भोजनास बोलावून अधिक पुण्य, समाधान मिळत असल्याची भूमिका सयाजीरावांनी घेतली आणि गुजराती ब्राह्मणांकडून दसऱ्याचे वेदोक्त विध करून घेतले.

 १९०५ च्या हिंदू विवाह कायद्यात १९२८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात आले. १९०३ मध्ये सयाजीरावांनी प्रायश्चित्त विधीची

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / १३