पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांचा अज्ञात परंतु अनमोल निबंध : The Depressed Classes
 भारतीय समाजाच्या उत्कर्षामध्ये अडथळा ठरणाऱ्या जातिव्यवस्थेची सप्रमाण चिकित्सा करणाऱ्या १९०९ मधील महाराजा सयाजीरावलिखित 'The Depressed Classes' या ऐतिहासिक इंग्रजी निबंधाचा उल्लेख सुरुवातीलाच आला आहे. या निबंधात सयाजीरावांनी जातीचा उगम, विकास आणि अंत यांचे वैज्ञानिक सूत्र मांडले आहे. हा निबंध म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या १९३६ मधील 'Annihilation Of Caste या जगप्रसिद्ध भाषण-निबंधाची पूर्वतयारी होती. १९१० मध्ये सयाजीरावांच्या प्रेरणेने आणि आर्थिक सहकार्याने श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 'स्पर्शास्पर्श अथवा चारही वर्णाचा परस्पर व्यवहार' हा ग्रंथ लिहिला.
तुलनात्मक धर्म अभ्यासक राजा

 १९१६ मध्ये महाराजांनी बडोदा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या अध्यासनाची स्थापना केली. या अध्यासनातर्फे १९१८ मध्ये तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी 'गायकवाड स्टडीज इन रिलीजन अँड फिलॉसॉफी' ही ग्रंथमाला सुरू करण्यात आली. ही आजवरची भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारची पहिली आणि एकमेव ग्रंथमाला आहे. या ग्रंथमालेत १७ ग्रंथ प्रकाशित झाले. १९१७ पासून

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १०