पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २४) अमरेली येथील दवाखान्यातील वापरात नसलेला एक विभाग केवळ दुष्काळग्रस्तांच्या उपचारासाठी राखीव ठेवून त्याचे नियंत्रण दुष्काळ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा आदेश.

 २५) दुष्काळ दौऱ्यावर येणाऱ्या महाराजांच्या स्वागतासाठी कुठल्याही प्रकारे पैसे खर्च करू नयेत आणि रयतेने जुन्या प्रथेप्रमाणे नजराणा देऊ नये असा आदेश सयाजीरावांनी दौरा सुरू करण्यापूर्वीच काढला होता. आदेशानंतरही प्रतिष्ठित लोकांकडून दिले गेलेले नजराणे महाराजांनी मदतकार्यासाठी दिले.
 २६) अमरेली येथील संपत आलेल्या सिंचन योजनेच्या कामावरील कामगारांना आणून विश्वामित्री योजनेच्या कामावर रुजू करण्याचे आदेश.

 २७) शहरातील भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने मंत्र्यांच्या सूचनेनुसार शहरांचे सौंदर्यीकरण, सांडपाण्याची व्यवस्था, तलावांची खोली वाढवणे, तलावांमध्ये भर टाकणे, रस्ते दुरुस्ती इ. कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा आदेश.
 २८) परिस्थिती आणि गरजेनुसार दुष्काळी कामांवरील कामगारांची संख्या कमी करण्याचे मंत्र्यांना आदेश.

 २९) बडोदा येथे अनाथालय सुरू करून दुष्काळात पालकांनी सोडून दिलेल्या आणि कोवळ्या वयातल्या अनाथ बालकांचा सांभाळ करण्याचा आदेश.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २८