पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १७) शेतसारा भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींना शक्यतोवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

 १८) विकलांग, शारीरिकदृष्ट्या दुर्बल, वयोवृद्ध व नवजात बालकांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थानाने घेतली.

 १९) रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बी-बियाणे आणि शेतीसाठी उपयुक्त वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना तगाई देण्याचे आदेश. यासाठी ५०,००० रु.ची तरतूद.

 २०) दुष्काळात मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्यू पावले. उर्वरित पशुधन वाचवण्यासाठी अर्ज केलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना गवताच्या लागवडीसाठी तगाई देण्याचा आदेश.

 २१) सोनगडहून आणलेल्या चारा विक्रीतील अनियमितता दूर करून कोणत्याही वशिलेबाजीशिवाय सर्व शेतकऱ्यांना योग्य किमतीत गवत मिळेल यावर वहिवाटदारांनी शिक्षक, नोधानी कामदार आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने लक्ष ठेवण्याचा आदेश.

 २२) खंगा येथे अन्नछत्र उघडून सरकारी खर्चाने कामगारांच्या नवजात बालकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा आदेश.

 २३) थंडीच्या दिवसात धारी आणि कोडीनार येथील अर्धवट कपड्यात काम करणाऱ्या बेघर मजुरांना वाटण्यासाठी कपडे मागवण्याचा आदेश. यासाठी १,५०० रु.ची तरतूद.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २७