पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोद्याच्या कृषी खात्याकडून मराठी भाषेतील कृषिविषयक त्रैमासिकाचे प्रकाशन केले जात होते. १९१५-१६ पासून या कृषी त्रैमासिकाच्या संपादनाचे काम सहकार खात्याकडे देण्यात आले. यावेळी त्याच्या नावात बदल करून या त्रैमासिकाचे 'कृषी व सहकार' असे नामकरण करण्यात आले. १९२७-२८ या वर्षात सहकार खात्याने शेतकऱ्यांना शेती संदर्भातील विविध विषयावरची वेळेत माहिती देण्यासाठी कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. हा सयाजीरावांच्या समन्वयवादी धोरणाचा परिणाम होता.
 १९३६ मध्ये हीरकमहोत्सव प्रसंगी सयाजीरावांच्या राज्यकारभाराच्या स्थापन करण्यात आलेल्या 'हीरकमहोत्सवी ट्रस्टने ' बडोद्याच्या कृषी औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले. या ट्रस्टमध्ये जनतेकडून गोळा झालेली रक्कम आधुनिक शेती पद्धती आणि इतर साहाय्यक उद्योगांचे शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात आली. ग्रामीण भागातील मुलींना या निधीतून बांधकामाचेदेखील प्रशिक्षण देण्यात आले. शेती आणि उद्योग यांच्यात परस्परपूरकता जोपासण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी १९३८ मध्ये कृषी औद्योगिक संस्थेची स्थापना केली.
 सयाजीराव महाराजांच्या शेती आणि ग्रामीण विकासाच्या शिस्तबद्ध नियोजनाची झलक दाखवणारा एक उपक्रम नमुना म्हणून येथे विचारात घेता येईल. कारण या नमुन्यामुळे

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १२