पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पानांचा ग्रंथ १८९६ मध्ये प्रकाशित झाला. विविध पिकांच्या लागवडीची शास्त्रोक्त माहिती या ग्रंथात देण्यात आली होती.
खासेरावांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या कृषी खात्याने १९०९ मध्ये शेती व शेतीपूरक विषयांची प्रगत माहिती देणारे ४८ पानांचे गुजराथी भाषेतील एक नियतकालिक सुरू केले. हे नियतकालिक ग्रामपंचायती, सहकारी पतपुरवठा संस्था, शेतकी संस्था, शेतकी बँका, कृषी संघटना इ. संस्थांना नियमितपणे पुरवले जाई. तसेच बडोद्यात ' वडोदरा खेतीवाडी' नावाच्या त्रैमासिकाचे मोफत वितरण करण्यात येत असे. कृषीसंबंधित विषयांवर ८ इतर पत्रके प्रकाशित केली जात होती. यापैकी ४ पत्रके ‘कडी प्रांत खेडूत सभा' या कृषी संघटनेकडून मोफत वाटली जात.
 एप्रिल १९१३ मध्ये कडी विभागात स्थापन करण्यात आलेली 'कडी प्रांत खेडूत सभा' ही कृषी संघटना वैशिष्ट्यपूर्ण होती. कडी विभागातील प्रत्येक तालुका स्तरावर या संघटनेचे विशेष संघटन करण्यात आले होते. १००० हून अधिक सदस्य असलेल्या या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कृषी पदवीधारकांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रगत यंत्रांची प्रात्यक्षिके दाखवली जात. त्याचबरोबर हे कृषी पदवीधर शेतकऱ्यांना बी-बियाणांची शास्त्रोक्त माहिती देऊन कृषिविषयक माहितीपत्रके वाटत.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ११