पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहभोजन केले. तर १८ ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथील डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वाढदिवस समारंभाचे सयाजीराव अध्यक्ष होते. यावेळी महाराजांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनला २,००० रु.ची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ५५ लाख ४५ हजार रु. हून अधिक भरते. या देणगीच्या व्याजातून डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ‘दमाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड' या नावाने शिष्यवृत्या चालू करण्यात आल्या. त्याचबरोबर सयाजीरावांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वसतिगृहातील रा. भटकर नावाच्या महार विद्यार्थ्याला मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा २५ रुपयांची स्कॉलरशिप दिली. विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्योद्धाराच्या संस्थात्मक कार्याला सयाजीरावांचा असलेला भक्कम पाठिबा यातून अधोरेखित होतो. विशेष बाब म्हणजे डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कार्याला १९०६ पासून प्रार्थना समाजानेसुद्धा सक्रिय पाठिंबा दिला होता.
विठ्ठल रामजी शिंदे आणि राष्ट्रीय काँग्रेस
 १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनात कळीची भूमिका बजावली. १९१५ मध्ये आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींनी काँग्रेसच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले हे आपण जाणतोच. परंतु महात्मा गांधींच्या या प्रयत्नांना पूरक पार्श्वभूमी शिंदेंनी आधीच तयार करून ठेवली

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / १६