पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या संदर्भात सरदेसाईंनी नोंदवलेले निरीक्षण पुरेसे बोलके आहे. सरदेसाई म्हणतात, “ब्रिटिशांशी लढणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करून त्यांचा सयाजीरावांनी धैर्याने बचाव केला, ही हिंदुस्थानातील अनोखी गोष्ट आहे. सयाजीराव महाराजांनी त्यांच्या शाहात्तर वर्षांच्या आपल्या हयातीत एवढे पराक्रम करून दाखविले की, इंग्रजी सत्तेच्या एका शतकात असे दुसरे राजे झाले नाही. बलिष्ठ सार्वभौम सत्तेशी सदैव झगडून आपले कायदेशीर हक्क शिकस्तीने सयाजीरावांनी सांभाळले. समस्त भारतात राजद्रोहाची व खून जाळपोळीची स्फोटक लाट उसळली, तीत अनेकांचा बचाव महाराजांनी धैर्याने केला की जेणकरून हिदुस्थानास नवीन स्फूर्ती मिळाली.”

 सयाजीरावांबद्दल सरदेसाईंनी व्यक्त केलेल्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत. सयाजीरावांसंदर्भात उपलब्ध सर्व मराठी साहित्य विचारात घेता सरदेसाईंच्या भूमिकेशी सुसंगत अशा अनेक तपशिलांचे संदर्भ यामध्ये उपलब्ध आहेत. परंतु दुर्दैवाने आधुनिक महाराष्ट्रावरील इतिहास लेखनात महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाचा पाया घालण्याबरोबरच त्याचा 'पुरोगामी' कळससुद्धा ज्या सयाजीरावांनी बसवला त्यांचा उल्लेखसुद्धा न होणे गंभीर आहे. एकूणच आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखनावर त्यातून असंख्य प्रश्न उपस्थित होतात.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २५