पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अव्यवस्थित होते ते सर्व एकत्र करून नकोत ते फाडून बाकीचे सांभाळून विल्हेवारीने निगेत ठेवणे हे काम महत्त्वाचे होते, ते मी सुचविले, त्यांना पटले आणि लगेच चरित्रसंग्रह नावाची स्वतंत्र शाखा काढून माझी त्यांनी त्याकरिता विशेष नेमणूक केली. हाताखाली दोन कारकून नेमले. स. १९१६ च्या डिसेंबरपासून तीन वर्षे मी या स्वतंत्र कामावर राबलो. (१) महाराजांनी लिहिलेली समस्त खासगी पत्रे जुन्या बारनिशा वगैरेंतून काढून त्यांच्या वीस प्रती छापल्या. (२) महाराजांनी सर्व भाषणे जमवून ती प्रसिद्ध केली. (३) समस्त राजपुत्रांचे कागद, पत्रे, हिशेब, नेमणुका इत्यादी सर्व जमवून प्रत्येकाचे स्वतंत्र संच व्यवस्थित लावून ठेविले. (४) कौटुंबिक व इतर फोटोग्राफ्स सर्व एकत्र जमवून कालक्रमाने व्यवस्थित केले. दरसालच्या वाढदिवसास असे महाराजांचे व कुटुंब - दरबारांचे फोटोग्राफ्स घेत ते त्यांच्या चरित्राचे एक मोठे साधन बनले. (५) खासगी खात्याचे व राज्याच्या व्यवहारांचे महाराजांनी वेळोवेळी दिलेले हुजूर हुकूम सर्व एकत्र संच जमवून निराळे ठेविले.
 याशिवाय महाराजांच्या कारभारांतील मुख्य घडामोडी, त्यांच्या स्वाऱ्या, त्यांचे प्रवास, त्यांनी केलेल्या मुख्य सुधारणा, त्यांचे दरबार व समारंभ, मुलांचे जन्मोत्सव व विवाहादी प्रसंग, खुद्द महाराजांचे दत्तविधान व शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनी बांधलेल्या इमारती अशा अनेक विषयांचे वर्णन करणारे लहान मोठे लेख मी मराठीत

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १६