पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांच्या चरित्रासाठीच्या साधनांचे संकलन
 महाराजांनी नेमलेल्या शेकडो समित्यांचे अहवाल, स्वतः च्या २६ परदेश प्रवासांचे अहवाल, शिष्यवृत्तीवर परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांचे अहवाल इ. दस्ताऐवज म्हणजे इतिहासाची प्राथमिक साधनेच आहेत. याच पद्धतीने त्यांच्या कारकीर्दीची परिपूर्ण माहिती देणारे चरित्र त्यांच्या साक्षीनेच प्रकाशित व्हावे ही महाराजांची स्वाभाविक इच्छा होती. यासाठी सरदेसाईंएवढा उत्तम लेखक दुसरा कोण असू शकतो? कारण एकतर सरदेसाईंनी इतिहासलेखनाच्या क्षेत्रात केलेले काम महाराजांसमोर होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अगदी महाराजांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून सरदेसाई दीर्घकाळ सयाजीरावांच्या सान्निध्यात होते. महाराजांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटनांचे सरदेसाई साक्षीदार होते.
 या संदर्भात सरदेसाई लिहितात, “महाराजांना आपले चरित्र संपूर्ण आपल्या देखत प्रसिद्ध व्हावे अशी मोठी हाव होती. मी लेखक व त्यांचा निकटवर्ती सेवक तेव्हा मला त्यांनी तशी सूचना पुष्कळदा केली. मी सांगितले माणसाची खरी योग्यता त्याच्या पश्चात् आजमावली जाते. मी त्यांचा पगारी नोकर, तोंडावर त्यांचे गुणावगुण कसे लिहू शकणार! तथापि चरित्राची सर्व साधने पत्रे, हुकूम, फोटोग्राफ, भाषणे, प्रासंगिक घडामोडी, बनाव हैं सर्व साहित्य जमवून एकत्र ठेवणे अवश्य होते. मुलांचे व्यवहार, प्रवास, विवाहादी समारंभ यांचे बनलेले कागद ठिकठिकाणी

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १५