Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे कळत नव्हते. दोघा बंधूंना नाराज न करण्याकरीता महाराजांनी फक्त बिनादुधाची काळी कॉफी घेऊन पाहुणचार लवकरच गुंडाळला आणि ज्या महाली (studio) चित्रे ठेवली होती तिथे सगळे गेले. महाराज एक एक चित्र मोठ्या नवलाईने पाहत होते. सर्वच पौराणिक चित्रे त्यांचं लक्ष वेधून घेत होती. साऱ्या महालात प्रचंड शांतता होती. सारी चित्रे बघून महाराज राजा रवी वर्मांकडे वळले. ते सुध्दा महाराजांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांनी महाराजांना न राहून विचारलं, “महाराज, चित्र आवडली?" त्या प्रश्नानं चित्रांच्या विचारत हरवलेले महाराज भानावर आले. रवी वर्मांकडे नजर रोखत ते म्हणाले, " राजे, माझ्याकडे आवडली, सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी पाश्चात्य देशात जाऊन आलो. अनेक चित्रशाळा पाहिल्या. बायबल आणि ग्रीक पुराणकथा यांवर आधारलेली आणि श्रेष्ठ युरोपियन चित्रकारांनी चितारलेली प्रार्थना मंदिरं मी पाहिली आहेत. इथं आल्यावर माझं स्वप्न हेच होतं की आपल्या भारतीय संस्कृतीची प्रतीक असलेली हे पौराणिक कथांचे प्रसंग चित्रांच्या माध्यमातून साकारावेत आणि हे रामायण महाभारतातले प्रसंग परदेशातल्या चित्रकारांप्रमाणे त्याच जिद्दीने कोणी करेल का? या माझ्या प्रश्नाचे उत्तर माधवरावांनी दिले. आपण ते काम करून माझे स्वप्न पूर्ण केले. माधवराव आठ महिन्यांपूर्वीच स्वर्गवासी झाले. आज असते तर माझ्यापेक्षा त्यांना जास्त आनंद झाला असता.”

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ३०