पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेदोक्त : बडोदा आणि कोल्हापूर  सयाजीरावांसारखी धर्मविषयक भूमिका आणि वैश्विक दृष्टी आधुनिक भारतात फार कमी लोकांकडे होती. ही दृष्टी त्यांनी जग प्रवास आणि धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र या विषयांवरील जगातले सर्वोत्तम ग्रंथ वाचून त्यावर भारतीय संदर्भात स्वतंत्र तुलनात्मक चिंतन करून कमावली होती. शाहू महाराजांचे इंग्रजी वाचनसुद्धा चांगले होते हे प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्मचरित्रातून कळते. दुर्दैवाने राजर्षी शाहूंचे वाचन या विषयावर संशोधन आणि लेखन न झाल्यामुळे त्यासंदर्भातील तपशील मिळत नाहीत.
 सयाजीरावांचा स्वभाव आत्मकेंद्री नसला तरी त्यांच्या चिंतनशील स्वभावाला एकांत आवडत असे. शाहू महाराजांचा स्वभाव मात्र मनात येईल ते कोणताही आडपडदा न ठेवता करणे आणि बोलणे असा होता. या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होण्यासाठी वेदोक्ताएवढे उत्तम उदाहरण नाही. आधुनिक काळातील वेदोक्त प्रकरण म्हटले की आपल्याला कोल्हापूर आणि शाहू महाराज आठवतात. परंतु कोल्हापूर अगोदर बडोद्यामध्ये हे प्रकरण उद्भवले.
बडोद्यातील वेदोक्त

 बडोद्यातील वेदोक्त प्रकरणाची सुरुवात १८९१ ला झाली. १८९१ मध्ये सयाजीराव जोधपूरला गेले असता तेथील शिवदत्त जोशी यांनी हे प्रकरण सयाजीरावांच्या लक्षात आणून दिले.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २०