पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाळा पूर्ण क्षमतेने काम करत होत्या. अस्पृश्यांच्या शाळांबरोबर सहशिक्षणाचा पर्याय शाहू महाराजांच्या हुकूमाअगोदर ३१ वर्षे सयाजीरावांनी लोकांपुढे खुला ठेवला होता. उदाहरण म्हणून विचारात घ्यायचे झाल्यास १९१०-११ मध्ये बडोद्यात अस्पृश्यांच्या २८८ शाळा होत्या. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९,६९५ होती. तर सहशिक्षण देणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी संख्या ५,८४६ होती. म्हणजेच अस्पृश्य शाळांतील विद्यार्थी संख्या मिश्र शाळेतील विद्यार्थी संख्येपेक्षा जवळजवळ दुप्पट होती.

 तर १९४०-४१ मध्ये ही परिस्थिती बरोबर उलटी झाली होती. १९१०-११ मध्ये अस्पृश्यांच्या शाळांची संख्या २८८ होती ती १९४०-४१ मध्ये ६० वर आली. तर अस्पृश्यांच्या शाळेतील विद्यार्थी संख्या १९४०-४१ मध्ये ४,१८९ इतकी खाली आली. तर मिश्र शाळेतील विद्यार्थी संख्या १६,६१८ इतकी झाली. म्हणजेच अस्पृश्यांच्या शाळांपेक्षा मिश्र शाळांतील विद्यार्थी संख्या चार पट वाढली होती. हे वास्तव विचारात घेता अस्पृश्यता निर्मूलनामध्ये सर्वात क्रांतिकारक यश सयाजीरावांनी साध्य करून दाखवले हे स्पष्ट होते. ही भारतातील सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती होती जिचा आजपर्यंत अभ्यास झालेला नाही.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १९