पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरील दोन अभ्यासकांच्या सयाजी-शाहू तुलनेचा पुढे विकास करायचा झाल्यास असे म्हणता येईल की, सयाजीराव हे कठोर बुद्धी आणि तर्क यांना अग्रक्रम देणारे होते. तर शाहू काहीसे भाबडे, थेट आणि मनात येईल ते तत्काळ तडीस नेण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे आणि भावनिक होते. भावनिक असणे हे जरी संवेदनशीलतेचे लक्षण असले तरी प्रशासकाकडे बुद्धी आणि भावना यांचे संतुलन असावे लागते. महत्त्वाचे म्हणजे बुद्धी आणि भावना यातील काय निवडायचे असे द्वंद्व निर्माण झाले तर प्रशासकाला भावनांवर संयमी लगाम ठेवून बुद्धीला प्राधान्य द्यावे लागते तरच निर्णय आणि धोरण दीर्घ पल्ल्याचा सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात.
बडोदा : पुरोगामी कोल्हापूरचे 'ऊर्जाकेंद्र'
 राजर्षी शाहूंचा देदीप्यमान इतिहास आपण गेली ६० वर्षे अभ्यासत आहोत. गेल्या २० वर्षात शाहू संशोधनाचा परमोच्च विकास महाराष्ट्रातील तथाकथित इतिहास संशोधकांनी जिद्दीने केला. त्याचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु महापुरुषांना 'सुपरमॅन' म्हणून सादर करण्याची स्पर्धा फारच केविलवाणी आणि मनोरंजक आहे. कारण महापुरुषांनी परस्परांचे हात पकडून 'विषमतेचा महापूर' पार करण्याची जीवघेणी लढाई प्राणपणाने लढली असताना अभ्यासक, अनुयायी, भक्त आणि संशोधक यांनी मात्र आपापल्या जातीच्या महापुरुषांवर 'खाजगी संपत्ती' सारखा दावा केला आहे.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १६