पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गंगारामभाऊ म्हस्के यांनी १८८३ मध्ये पुण्यात मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन' या संस्थेची स्थापना केली. मराठा जातीतील पहिली उच्च शिक्षण घेतलेली पिढी म्हस्केंमुळे तयार झाली. महाराजांनी या संस्थेला १८८५ ते १९३९ पर्यंत असे ४५ वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी होती. आजच्या रकमेच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य ७२ कोटी ४५ लाखांहून अधिक भरते.

 मराठीतील आद्य शिवचरित्रकार कृष्णराव अर्जुन केळूसकर हे सयाजीरावांच्या प्रेरणेनेच लेखक झाले. महाराजांनी मॅक्स मुल्लरने भाषांतरित केलेल्या 'सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट' या मालेत प्रकाशित केलेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी केळूसकरांवर सोपवली. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळुसकर हे पहिले ब्राह्मणेतर लेखक ठरतात. पुढे १९०६ मध्ये सयाजीरावांनी केळूसकरलिखित 'छत्रपती शिवाजी महाराज' या चरित्र ग्रंथास आर्थिक साहाय्य करत या ग्रंथाच्या २०० प्रती विकत घेतल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गौतम बुद्ध समजले आणि अनिवार आकर्षण निर्माण झाले ते केळूसकरांच्या गौतम बुद्धाच्या चरित्रामुळेच.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २०