पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थापना केली. रावसाहेब शिरगावकरांच्या शिफारशीवरून गंधर्व नाटक मंडळींना महाराजांनी राजाश्रय दिला. महाराजांच्या अटीनुसार गंधर्व नाटक मंडळी वर्षातून एक महिना बडोद्यास जायचे. महाराजांचा आश्रय मिळाल्यामुळे “श्री बडोदे सरकार यांच्या खास आश्रयाखाली” असा उल्लेख गंधर्व कंपनीच्या जाहिरातीवर झळकू लागला. बालगंधर्वांच्या बडोदा भेटीतील पहिला नाट्यप्रयोग राजवाड्यात खासगीत होत असे. प्रत्येकवेळी महाराज बालगंधर्वांच्या सन्मानार्थ एक हजार रुपये तर इतर सहकलाकारांना चार हजार रुपये देत असत. पुढे महाराजांकडून गंधर्व कंपनीला ५,००० रुपयांचे वर्षासन मिळू लागले. महाराजांविषयी बालगंधर्व आत्मचरित्राच्या टिपणात लिहितात- ' अशी विशुद्ध, निरपेक्ष रसिकता आणि औदार्य आता दुर्लभच'.
दादासाहेब फाळके

 चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे धडे बडोद्याच्या कलाभवनमध्ये गिरवले. त्याकाळी अद्ययावत डार्करूम, आधुनिक किमतीचे विलायतेतले कॅमेरे इ. तंत्रज्ञान कलाभवनात उपलब्ध असल्याने दादासाहेबांना या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ झाला. महाराजांनी दादासाहेब फाळकेंना लंडन येथील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. बडोद्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना दादासाहेब म्हणतात, '... मला सयाजीराव महाराजांची राजधानी बडोद्याने

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १५