पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषांतराला पाठबळ
 १ सप्टेंबर १९२७ रोजी बडोद्यात प्राच्यविद्या संस्थेची स्थापना करण्यात आली. सामान्य प्रजेला ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून उत्तम ग्रंथांचे गुजराथी व मराठीत भाषांतर करण्याचे काम सुरू झाले. १९३२ अखेर महाराजांनी भाषांतर शाखेसाठी दीड लाख रुपये खर्च केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४१ कोटी २५ लाख रु. हून अधिक भरते.
 या संस्थेत हस्तलिखितांचा संग्रह, छापील किंवा प्रकाशित पुस्तके, समिक्षित आवृत्ती विभाग, भाषांतर विभाग असे एकूण चार विभाग आहेत. भाषांतर विभागांतर्गत हिंदूधर्मासोबतच जैन, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माची पुस्तके मराठी, गुजराती, हिंदीमध्ये भाषांतर करून धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला. यातूनच “सयाजी साहित्यमाला”, “सयाजी बाल ज्ञानमाला” इ. ग्रंथमाला सुरू करण्यात आल्या.

 जुने खेळ नामशेष होऊ नयेत व पाश्चात्त्य खेळांची माहिती जनतेला मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या क्रीडा ग्रंथमालेत कालेलकरलिखित 'मराठी खेळांचे पुस्तक' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला. लोकसाहित्यावरील मराठीतील पहिले पुस्तक म्हणजे आर. ए. एन्थोवेन यांच्या 'The Folklore of Bombay' या ग्रंथाचा गोविंद मंगेश कालेलकर यांनी केलेला 'लौकिक दंतकथा' हा मराठी अनुवाद सयाजीसाहित्य मालेत १९३४ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १३