पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेती व सहकारविषयक नियतकालिके

सयाजीरावांनी संस्थानातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा स्वतंत्र नियतकालिके सुरू केली होती. यामध्ये १९२७-२८ दरम्यान सहकार खात्याचे अधिकृत मुखपत्र म्हणून 'ग्रामजीवन' हे त्रैमासिक सुरू केले. हे सुद्धा सहकार विषयाला वाहिलेले मराठीतील पहिले नियतकालिक आहे. यातून सहकार चळवळीबाबतची ध्येय-धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले. तसेच 'ग्रामजीवन'च्या माध्यमातून ग्रामीण पुनर्निर्माणाशी संबंधित सहकार खात्याचे निर्णय व संस्थानची सहकारविषयक धोरणे लोकांपर्यंत पोहोचत. सयाजीरावांनी 'ग्रामजीवन' प्रमाणेच 'शेती व सहकार्य' या त्रैमासिकाचेदेखील प्रकाशन सुरू केले. हे त्रैमासिक गुजराथी भाषेत प्रकाशित होत असे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून सहकाराबरोबरच कृषीसंबंधित विविध विषयांच्या माहितीचा समावेश होता. शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी १९२७-२८ मध्ये सहकार खात्याने 'कृषी दिनदर्शिका' प्रकाशित केली. त्यानुसार पुढील कामकाज सुरू झाले. महाराजांनी उत्तम पत्रकारितेच्या माध्यमातून संस्थानात आदर्शवत कार्य उभे केले.

हाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / २१